बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला. या घटनेत २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत काही प्रवासी वाचले आहेत. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती जी पुण्याकडे निघाली होती त्या बसला रात्री दीड च्या सुमारास अपघात झाला. बस पलटल्यानंतर १९ आणि २० नंतबरच्या सीटवर बसलेले दोन प्रवासी हे काच फोडून बाहेर आले आणि त्यांनी कसाबसा जीव वाचवला.
काय सांगितलं आहे या प्रवाशांनी?
नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बस मध्ये आम्ही बसलो होतो. रात्री आमचं जेवण झालं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. ही बस उलटली. बस उलटल्यानंतर बसने पेट घेतला. आम्ही १९ आणि २० नंबरच्या सीटवर बसलो होतो. वरची काचेची खिडकी आम्ही तोडली आणि बाहेर पडलो.
बस उलटल्यानंतर बसला आग लागली. त्यानंतर या बसचे टायरही फुटले. डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण बस पेटली. अशीही माहिती या प्रवाशांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर घटना स्थळी पोलीस आले, अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली असंही या दोन प्रवाशांनी सांगितलं.
पोलिसांनी या अपघाताविषयी काय सांगितलं?
साधारण रात्री दीडच्या सुमारास या बसचा अपघात झाला. या बसमध्ये ३२ प्रवासी होते. २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. इतर प्रवासी वाचले आहेत. बस उलटल्यानंतर या बसने पेट घेतला. डीझेल टँक फुटून आग लागली आणि वाढली त्यामुळे बसमधले प्रवासी होरपळले. काही प्रवासी काचा फोडून बाहेर पडले असंही पोलिसांनी सांगितलं. बसच्या केबिनमध्ये दोन ड्रायव्हर होते. एकजण झोपला होता तर दुसरा गाडी चालवत होता. एक चालक बचावला असून दुसऱ्याचा मृत्यू झाला अशीही माहिती पोलिसांनी दिली.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा बसला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात झाला. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी (१ जुलै) दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “झालेली घटना अतीशय दुर्दैवी व दुःखद आहे. विदर्भ एक्स्प्रेस ही खासगी बस नागपूरहून निघाली होती. मी पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. यात दुर्दैवाने २५ लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. जे सुखरूप आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.”-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गडकरी, फडणवीस यांना दुःख
बस अपघातात दगावलेल्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ही घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत आठजण जखमी झाले असून, त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे त्यांनी शोकसंदेशात नमुद केले आहे