Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

काळ्या बाजारात जाणाऱ्या तांदळासह ट्रक जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

 


• मलकापूर : प्रतिनिधी

    अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येणाऱ्या १० टन तांदळासह १८ लाख ५० हजारांचे साहित्य मलकापूर ग्रामीण पोलिसांनी ११ जुलै रोजी जप्त केले. या प्रकरणी दोघांविरूध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत माहिती अशी की, मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एफ. सी. मिर्झा यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून ११ जुलै रोजी आठवडी बाजारातील खान ब्रदर्स या दुकानासमोर उभ्या असलेल्या टाटा ट्रकची (क्रमांक आरजे ३२- जीए ५४६३) पोलिसांनी पाहणी केली. 

    यावेळी त्यामध्ये अंदाजे १५० ते २०० कट्टे तांदूळ आढळून आला. ट्रकचालक कासिमखान नजरखान (वय ५०, रा. दयापूर, ता. किसनगडबास, जि. अलवर, राजस्थान) याला तांदळाच्या मालकाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता हसनखानअब्दुलखान (वय ४०, रा. ताजनगर, मलकापूर) याच्या सांगण्यावरून हा तांदूळ अहमदाबाद येथे काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले.या ट्रकमधील १० टन १६० किलोग्रम असा अंदाजे ३ लाख ५० हजारांचा तांदूळ व १५ लाखांचा टाटा ट्रक असा १८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला. तसेच दोघांविरूध्द अप.नं. ३६४ / २०२३ नुसार कलम ३, ७ जीवनावश्यक वस्तू अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केला.