पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून टाकला छापा, दोघांविरूध्द गुन्हा दाखल
शेगाव
विदर्भाची पंढरी म्हणून संतनगरी शेगावची ओळख.. केवळ विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून, देशभरातून भाविक संत गजानन महाराजांच्या चरणी माथा श्रद्धेने माथा टेकवायला येतात, मात्र या पवित्र नगरीतही अपवित्र काम करणारे काही जण आहेतच. असल्या भामट्यांना देवाची देखील भीती वाटत नाही.. अगदी मंदिराच्या समोरच वैभव गेस्ट हाऊस च्या मालकाने पैसे कमावण्यासाठी अपवित्र धंदा टाकला. वासनेचे भुकेले लोक तिथे जायचे, गेस्ट हाऊसचा मालक तिथे आणलेल्या महिलांकडून अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय करून घ्यायचा.. अखेर पोलिसांना वैभव गेस्ट हाऊसच्या मालकाच्या पापाची खबर मिळाली. पोलिसांनी बनावट गि-हाईक पाठवून मिळालेल्या माहितीची खात्री केली. खात्री होताच लॉजवर धाड टाकून लॉज मॅनेजरला ताब्यात घेतले, लॉज मध्ये विविध वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शेगावचे दबंग ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी ही धडक कारवाई १० ऑगस्टच्या सायंकाळी केली. आज ११ ऑगस्टला लॉजमालक आणि लॉज मॅनेजरविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरासमोर आनंद उर्फ पपल्या रवींद्र गुजर याच्या मालकीचे वैभव गेस्ट हाऊस आहे. या लॉज मध्ये महिलांना आणून त्यांच्याकडून अवैधरित्या देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याची गुप्त बातमी शेगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहीतिची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला बनावट गि-हाईक बनवून त्याच्याकडे पैसे देऊन लॉज मध्ये पाठवले. बनावट गि-हाईकाकडून "त्या" कामासाठी लॉज मॅनेजरने पैसे स्वीकारून एका खोलीत जायला सांगितले. लॉज मध्ये पाप होत असल्याचा संदेश बनावट गि-हाईकाने लॉजभोवती सापळा रचून असलेल्या पोलिसना पाठवला, त्यानंतर लगेच पोलिसांनी लॉज वर धाड टाकली. लॉज मॅनेजरच्या ड्रॉवर मध्ये पोलिसांना २ वेगवेगळ्या कंपनीचे ७ कंडोम सापडले.
शिवाय ३ हजार रुपये कॅश, एक विवो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. लॉजचा मॅनेजर आकाश राजेश देशमुख (२२, रा. गजानन नगर, डाबकी रोड अकोला) आणि लॉज मालक आनंद उर्फ पपल्या गुजर यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेदार सुनील अंबुलकर करीत आहेत. संतनगरी शेगाव ही पवित्र नगरी आहे. या पवित्र नगरीत अपवित्र काम हॉटेल मालकांनी चालकांनी करू नये, तसे होत असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यास पोलीस त्यावर कडक कारवाई करतील असे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी सांगितले.
सदर कारवाई माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव श्री विनोद ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर चे ठाणेदार सुनील अंबुलकर पोलीस उपनिरीक्षक राहुल कातकडे पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पोलीस उपनिरीक्षक सरिता कुवरे, पोहेका विशाल माने, पोलीस नाईक राहुल पांडे, पोलीस कॉन्स्टेबल विजय साळवे, अमोल बनारे, महिला पोलीस शितल कपाटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव कार्यालयाचे पोलीस नाईक सुधाकर थोरात, लासुरकर, योगेश कुवारे, महिला पोलीस प्रतीक्षा जाधव यांनी केली आहे.