बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गुप्त माहिती मिळाली की, नॅशनल हायवे रोड खालसा ढाबा मलकापूर येथे एन. एल. ०१ एन. ५९९६ क्रमांकचा एक नागालँड पासिंग कंटेनर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा माल घेऊन आलेला आहे. मिळालेल्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात खामगाव, देवराव गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर व पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी मलकापूर शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनात माहितीची खात्री करून पोलिसांनी नॅशनल हायवे रोडने खालसा ढाबा येथे जाऊन त्या नागालैंड पासिंग कंटेनरच्या चालकाची विचारपुस केली असता चालक कंटेनर सोडून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या राखाडी व फिक्कट गुलाबी रंगाच्या गोण्यामध्ये प्रतिबंधित केलेला राज निवास पान मसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.
सदर कंटेनर पोलीस स्टेशन येथे आणून मोजमाप केली असता त्यामध्ये १६० प्लास्टिकच्या राखाडी व फिकट गुलाबी रंगाच्या गोण्यामध्ये प्रत्येक गोणीची किंमत ३८४०० रुपये प्रमाणे, ३२ प्लास्टिकचे पांढरे रंगाचे गोण्या प्रत्येक गोणीचे किंमत ४८०० रुपये, अशोक ले लॅन्ड कंपनीचे कंटेनर असा एकूण १,०६,८०,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई उपविभागीय कार्यालयाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे, सपोनि. करुणाशिल तायडे, स.फौ. भगवान मुंढे, पोहेकॉ. प्रकाश कोळी, पोकॉ. संदिप खोमने, पोकॉ. अल्पेश फिरके, पोकॉ. सचिन कवळे, पोकॉ. तमखने, चालक पोहेकॉ. गणेश सावे, पोकॉ. शेख आसिफ, पोकॉ. आनंद माने, पोकॉ. गोपाल तारुळकर, पोकों ईश्वर वाघ, पोकॉ. प्रमोद राठोड यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन मलकापूर शहर करीत आहे.